sangharshnayak.in

निडर, निष्पक्ष, सिर्फ खबरे नहीं; हकीकत सामने लाते हैं |

संतापलेल्या प्रियकराने जंगलात नेऊन संपवले!

जळगाव (प्रतिनिधी): प्रेमसंबंधातून निर्माण झालेल्या वादाचे रूपांतर एका भीषण हत्याकांडात झाल्याची धक्कादायक घटना जळगावच्या एरंडोल तालुक्यात उघडकीस आली आहे. प्रेयसी तृतीयपंथी असल्याचे समजल्यानंतर, तिला संपवून पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह जाळणाऱ्या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेने (L C B) अवघ्या ४८ तासांत अटक केली आहे. ४ फेब्रुवारी २०२६ रोजी एरंडोल तालुक्यातील पद्मालय ते नागदुली रस्त्यावरील निर्जन जंगलात एका महिलेचा अर्धवट जळालेला आणि विद्रूप अवस्थेतील मृतदेह सापडला होता. आरोपीने ओळख पटू नये म्हणून पीडितेचा चेहरा आणि छाती पेट्रोल टाकून जाळली होती. डोंगरदऱ्यांचा भाग असल्याने पोलिसांसमोर तपासाचे मोठे आव्हान होते. पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी तपासासाठी ४ पथके तैनात केली होती. मृतदेहाची अवस्था अत्यंत खराब असतानाही दोन छोट्या गोष्टींनी तपासाला दिशा दिली: १. पायांवरील मॅजंटा नेलपॉलिश. २. नाकातील सोन्याची ‘मुरणी’.या खुणांवरून मृतदेहाची ओळख आकांक्षा उर्फ अजय गेड्रे (रा. छत्तीसगड) अशी पटली. न्यायवैद्यक शास्त्रानुसार तिचा मृत्यू ३० ते ३१ जानेवारी दरम्यान झाला होता.पोलिसांनी तांत्रिक पुराव्यांच्या आधारे संशयित गोलू उर्फ स्वप्नील पाटील (रा. पहूर, जामनेर) याला ताब्यात घेतले. सखोल चौकशीत त्याने खुनाची कबुली दिली. स्वप्नील आणि आकांक्षा यांचे प्रेमसंबंध होते. मात्र, आकांक्षा तृतीयपंथी असल्याचे समोर आल्यावर स्वप्नीलने तिला संबंध तोडण्यास सांगितले. आकांक्षा यासाठी तयार नव्हती, ज्यामुळे त्यांच्यात वाद होत होते.

असा रचला मृत्यूचा सापळा

स्वप्नीलने आकांक्षाला सुरतहून जळगावला बोलावले. तिथून तिला पद्मालयच्या जंगलात नेले. तिथे झालेल्या वादात रागाच्या भरात त्याने तिच्या डोक्यात प्रहार केला आणि ओढणीने गळा आवळून तिची हत्या केली. पुरावा नष्ट करण्यासाठी त्याने स्वतःच्या दुचाकीतील पेट्रोल काढून मृतदेह जाळण्याचा प्रयत्न केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *