चिखली : कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी चिखली पोलिसांनी सराईत गुन्हेगाराविरुद्ध कठोर कारवाई करत सुनील उर्फ “लाला” हिरालाल चुनावाले (वय 50 वर्षे, रा. आठवडी बाजार, चिखली, जि. बुलडाणा) याला दोन महिन्यांसाठी बुलडाणा जिल्ह्यातून तडीपार केले आहे.
मुंबई पोलीस अधिनियम कलम 56(1)(अ)(ब) अंतर्गत मा. उपविभागीय दंडाधिकारी, बुलडाणा यांनी 27 मे 2026 रोजी दिलेल्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली. संबंधित व्यक्तीच्या हालचाली व त्याच्याविरुद्ध असलेल्या नोंदींचा विचार करून जिल्ह्यातील शांतता व सार्वजनिक सुव्यवस्था राखण्याच्या उद्देशाने तडीपारीचा आदेश जारी करण्यात आला आहे.
ही कारवाई मा. पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलीस निरीक्षक भुषण गावंडे यांच्या नेतृत्वात डी.बी. पथकातील पोलीस नाईक अमोल गवई, पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत धंदर, अजय इटावा, पंढरीनाथ मिसाळ, राहुल पायघन, निलेश सावळे, रुपाली उगले तसेच चिखली पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी ही कारवाई यशस्वीरीत्या पार पाडली.
चिखली पोलिसांच्या या कारवाईमुळे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींमध्ये धाक निर्माण होण्यास मदत होणार असून, जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी अशा कारवाया पुढेही सुरू राहतील, असा संदेश पोलिस प्रशासनाने दिला आहे.












Leave a Reply