खामगाव, प्रतिनिधी : खामगाव तालुक्यात दाखल करण्यात आलेल्या कथित NDPS प्रकरणात आपला भाऊ मोहम्मद अतीक मोहम्मद शफीक याला जाणीवपूर्वक अडकविण्यात आल्याचा गंभीर आरोप पत्रकार मोहम्मद तोसिफ यांनी केला आहे. गेल्या सहा महिन्यांपासून कथित अवैध बायोडिझेल प्रकरणावर सातत्याने आवाज उठवत असल्यामुळेच आपल्या कुटुंबाला लक्ष्य करण्यात आल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आहे.या प्रकरणाची निष्पक्ष व उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी, यासाठी पत्रकार मोहम्मद तोसिफ यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी (DYSP), अतिरिक्त पोलीस अधीक्षक, पोलीस महानिरीक्षक (IG), महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्याकडे व्हिडिओ संदेशाद्वारे न्यायाची मागणी केली आहे.
“जर माझा भाऊ गुन्हेगार असेल तर त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी. मात्र तो निर्दोष असेल, तर या संपूर्ण प्रकरणामागील खरे आरोपी आणि सूत्रधार जनतेसमोर आणले गेले पाहिजेत,” असे मोहम्मद तोसिफ यांनी म्हटले आहे.तसेच त्यांनी राज्यातील पत्रकार बांधवांना आवाहन करताना सांगितले की, “आज जर एका पत्रकाराच्या कुटुंबावर असा अन्याय होत असेल, तर सामान्य नागरिकांचे काय होईल? सत्यासाठी आवाज उठवणाऱ्यांना खोट्या प्रकरणात अडकवले जात असेल, तर ही लोकशाहीसाठी अत्यंत गंभीर बाब आहे.”
सखोल तांत्रिक तपासणीची मागणी
या प्रकरणातील सत्य समोर यावे यासाठी खालील तांत्रिक व डिजिटल पुराव्यांची सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे:
- घटनास्थळ परिसरातील सर्व CCTV फुटेज जप्त करण्यात यावेत.
- DVR व हार्डडिस्कची फॉरेन्सिक तपासणी करण्यात यावी.
- संबंधित व्यक्तींचे Call Detail Records (CDR) तपासण्यात यावेत.
- मोबाईल लाईव्ह लोकेशन व टॉवर लोकेशनची पडताळणी करण्यात यावी.
- संबंधित कालावधीत गोडाऊन परिसरात आलेल्या व गेलेल्या व्यक्तींची माहिती तांत्रिक तपासातून समोर आणण्यात यावी.
- परिसरातील ऑनलाइन सर्व्हेलन्स सिस्टम, डिजिटल डेटा आणि इलेक्ट्रॉनिक पुराव्यांचे विश्लेषण करण्यात यावे.
- घटनास्थळावरील सर्व हालचालींची निष्पक्ष आणि पारदर्शक चौकशी करण्यात यावी.
“सत्य बाहेर आलेच पाहिजे आणि निर्दोषांना न्याय मिळालाच पाहिजे,” अशी ठाम भूमिका पत्रकार मोहम्मद तोसिफ यांनी व्यक्त केली आहे.











Leave a Reply