अंबेडकरनगर { उ.प. } जिल्ह्यात एका शिक्षिकेची दिवसाढवळ्या गळा चिरून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सोनी सिंह (वय ३३) असे मृत शिक्षिकेचे नाव असून, त्यांचा मृतदेह त्यांच्याच घरात स्वयंपाकघरात रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला. याप्रकरणी पोलिसांनी मृत शिक्षिकेच्या पतीला, जो भाजपचा स्थानिक नेता आणि माजी शहर प्रवक्ते असल्याचे सांगितले जात आहे, त्याला संशयावरून ताब्यात घेतले आहे.मिळालेल्या माहितीनुसार, अकबरपूर येथील गांधी आश्रम कॉलनीत ही घटना घडली. सोनी सिंह या एका खाजगी शाळेत (सेंट जॉन्स स्कूल) शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या. सोमवारी दुपारी त्या घरात असताना, त्यांच्यावर धारदार शस्त्राने (विळ्याने) वार करून त्यांची हत्या करण्यात आली.
घटना घडली त्यावेळी घरातील इतर सदस्य बाहेर गेले होते. सोनी यांची सासू बाजारात सामान आणण्यासाठी गेल्या होत्या, तर सासरे देखील काही कामानिमित्त बाहेर होते. मुले शाळेत गेली होती. सासू जेव्हा घरी परतल्या, तेव्हा त्यांना सोनी यांचा मृतदेह स्वयंपाकघरात रक्ताने माखलेल्या अवस्थेत दिसला. त्यांनी आरडाओरड केल्यानंतर शेजाऱ्यांनी आणि कुटुंबीयांनी पोलिसांना माहिती दिली. पतीवर हत्येचा संशय पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, या हत्येमागे सोनी सिंह यांचा पती उमाशंकर सिंह (सोनू) याचा हात असल्याचा संशय आहे. उमाशंकर हा भाजपचा नगर मीडिया प्रभारी (प्रवक्ता) असल्याचे समजते. सूत्रांच्या माहितीनुसार, उमाशंकरला पत्नीच्या चारित्र्यावर संशय होता. याच संशयातून आणि मुलांच्या पितृत्वावरून दोघांमध्ये वाद होत असल्याचे बोलले जात आहे. घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. तसेच घटनास्थळावरून हत्येसाठी वापरलेले धारदार शस्त्र (विळा) देखील जप्त करण्यात आले आहे. पोलिसांनी पती उमाशंकरला ताब्यात घेतले असून त्याची कसून चौकशी सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.












Leave a Reply