चिखली/बुलढाणा, दि. २८ एप्रिल २०२६ (प्रतिनिधी) —
“शिवाजी कोण होता” या पुस्तकाच्या वाचनाच्या माध्यमातून आंदोलन करण्याच्या तयारीत असलेल्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी खामगाव चौफुली येथे रोखत मोठी कारवाई केली. या प्रकरणात पुरुष व महिला मिळून २० हून अधिक आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापूर येथून प्रशांत आंबी यांच्या नेतृत्वाखालील कार्यकर्ते बुलढाण्याकडे आंदोलनासाठी येणार असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार खामगाव चौफुली परिसरात कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. दरम्यान, आंदोलनकर्त्यांची वाहने चौफुलीवर पोहोचताच पोलिसांनी त्यांना अडवून कायदेशीर बाबींची माहिती दिली. तसेच भा.ना.सु.सं. कलम १६८ अंतर्गत नोटीस बजावण्यात आली. तरीदेखील कार्यकर्ते आपल्या निर्णयावर ठाम राहून पुढे जाण्याचा प्रयत्न करीत होते. यावेळी आंदोलनकर्त्यांनी चौफुलीवर बसून रास्ता रोको करण्याची तयारी सुरू केली. पोलिसांनी वारंवार समजावून सांगूनही आंदोलन मागे घेतले नाही. त्यामुळे कोणताही सार्वजनिक सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी ठानेदर भूषण गावंडे यांच्या मार्गदर्शना मधे पोलिसांनी कारवाई करत सर्वांना ताब्यात घेतले.

या कारवाईत रमेश पंडीत वडंगेकर (५६), शहानुर शेख (३०), सुनिल शिवाजी जाधव (५४), दिलदार मुजावर (४३), सुनिल सत्याप्पा कोळी (२३), उत्कर्ष सुभाष पवार (४६), समीर सदाशिव मोरे (५२), धिरज प्रबुद्ध कठारे (३१), प्रशांत श्रीकांत आंबी (३१), हरीश भीमराव कांबळे (३२), सुशिलकुमार शिवाजी शिंदे (३५), श्रीकांत सत्याप्पा कोळी (१९), गिरीष आनंदा फोंडे (५०), रघुनाथ कांबळे (६०) आदींसह काही महिलांचा समावेश आहे. महिला आंदोलनकर्त्यांनाही महिला पोलीस कर्मचाऱ्यांच्या मदतीने ताब्यात घेण्यात आले. सर्वांना दुपारी सुमारे १२.३० वाजता चिखली पोलीस ठाण्यात आणण्यात आले असून, मपोका कलम ६८ अंतर्गत पुढील कार्यवाही करण्यात येत आहे. दरम्यान, या ठिकाणी अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर, तसेच चिखली पोलीस ठाण्याचे कर्मचारी व आरसीपी मलकापूर पथक मोठ्या संख्येने तैनात होते. पोलिसांच्या तत्पर कारवाईमुळे संभाव्य कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न टळल्याचे सांगितले जात आहे.













Leave a Reply