sangharshnayak.in

निडर, निष्पक्ष, सिर्फ खबरे नहीं; हकीकत सामने लाते हैं |

वामन यंगड यांचा मृत्यू ‘खून’ असल्याचा आरोप


बुलढाणा:– माळवंडी (ता. खामगाव) येथील वामन काशिराम यंगड यांच्या मृत्यू प्रकरणात खुनाचा संशय व्यक्त करत आरोपींवर तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच आरोपींना अभय देणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर आणि चुकीचा वैद्यकीय अहवाल देणाऱ्या डॉक्टरांवरही कठोर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दि. १९ मार्च रोजी वामन यंगड यांना गावातील संदीप कड, श्रीराम चव्हाण व विजय नाटेकर यांनी घरातून सोबत नेले. सायंकाळी सुमारे ६.३० वाजता त्यांना मृत अवस्थेत फरफटत घरी आणण्यात आले. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, यापूर्वी दि. २४ ऑक्टोबर २०२५ रोजी संदीप कड यांच्या कुत्र्याने वामन यंगड यांना ११ ठिकाणी चावा घेतला होता. त्या घटनेनंतर दोन्ही कुटुंबांमध्ये वाद निर्माण झाला होता. त्यानंतरही वामन यंगड यांना दोन ते तीन वेळा मारहाण करण्यात आल्याचा आरोप आहे. मात्र, आरोपींच्या दबावामुळे याबाबत तक्रार दाखल करण्यात आली नव्हती.
घटनेच्या दिवशी वामन यंगड हे शुद्धीत व नशेत नसल्याचे सांगण्यात आले आहे. ते घरातून पांढरा शर्ट व काळी पॅन्ट घालून गेले होते. मात्र, परत आणताना त्यांच्या अंगावरील कपडे बदललेले होते. तसेच त्यांच्या शरीरावर मारहाणीच्या खुणा असून डोक्याला गंभीर दुखापत होऊन रक्तस्त्राव झाल्याचेही नातेवाईकांनी नमूद केले आहे.
यानंतर कुटुंबीयांनी त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालय, बुलढाणा येथे नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. या प्रकरणी त्याच दिवशी पत्नीचा जबाब बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.
तथापि, वारंवार मागणी करूनही अद्याप आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. तसेच रक्ताने माखलेले कपडे जप्त न केल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे पुरावे नष्ट होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
निवेदनात पुढे असा आरोप करण्यात आला आहे की, शवविच्छेदन अहवालात शरीरावरील जखमांचा उल्लेख करण्यात आलेला नाही, ज्यामुळे आरोपींना वाचविण्याचा प्रयत्न होत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
या प्रकरणाचा सखोल तपास करून आरोपींना अटक करावी, तसेच निष्काळजीपणा करणाऱ्या पोलीस अधिकारी व संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
अन्यथा, वामन यंगड यांना न्याय मिळावा यासाठी व भ्रष्ट व्यवस्थेच्या निषेधार्थ “धडकी मोर्चा” काढण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. हा मोर्चा घटना स्थळापासून मार्गक्रमण करत रायपूर पोलीस ठाण्यावर धडकणार असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
हा इशारा सुषमा वामन यंगड यांच्यासह अॅड. गुणवंत नाटेकर, अनिल सुरडकर, निखिल नाटेकर, अश्विनी यंगड व सौ. रेणुका नाटेकर यांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *