बुलढाणा :- बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर शहरात एक अतिशय धक्कादायक आणि चिंताजनक घटना उघडकीस आली आहे. येथील हनुमान नगर या उच्चभ्रू वस्तीमध्ये वास्तव्य करणाऱ्या पटेल कुटुंबातील तीन सदस्य अचानक बेपत्ता झाले आहेत. यामध्ये ३२ वर्षीय आईसह तिच्या दोन लहान मुलांचा समावेश असल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.
विशेष म्हणजे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत वेगवेगळ्या ठिकाणांवरून एकूण सात जण बेपत्ता झाल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मलकापूर शहरातील हनुमान नगर परिसरात वसंत कुमार पटेल हे आपल्या परिवारासह राहतात. त्यांची पत्नी मित्तल पटेल (वय ३२), मुलगी सिया पटेल (वय ११) आणि मुलगा देवांश पटेल (वय ८) हे तिघेही बाजारात जाण्यासाठी घरातून बाहेर पडले होते. मात्र, बराच कालावधी उलटून गेला तरीही पत्नी आणि दोन्ही मुले घरी परतली नाहीत. त्यामुळे वसंत कुमार पटेल यांनी त्यांचा आजूबाजूला आणि नातेवाईकांकडे शोध घेतला, परंतु त्यांचा कोणताही सुगावा लागला नाही.
अखेर, पत्नी आणि मुलांचा शोध लागत नसल्याने हवालदिल झालेल्या वसंत कुमार पटेल यांनी तातडीने मलकापूर शहर पोलीस ठाणे गाठले. त्यांनी आपली पत्नी आणि दोन मुले संशयास्पदरित्या बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसांत दाखल केली आहे. या तक्रारीची दखल घेत पोलिसांनी त्वरित तपासकार्य सुरू केले आहे. ही घटना घडली असतानाच, बुलढाणा जिल्ह्याच्या इतर भागांतूनही एकाच दिवसात आणखी काही व्यक्ती बेपत्ता झाल्याच्या तक्रारी विविध पोलीस ठाण्यांमध्ये प्राप्त झाल्या आहेत. पटेल कुटुंबातील तीन सदस्यांसह जिल्ह्यातून एकूण सात जण बेपत्ता झाल्याची नोंद झाली आहे.
एकाच वेळी इतक्या मोठ्या संख्येने नागरिक आणि विशेषतः लहान मुले व महिला बेपत्ता झाल्यामुळे पोलीस प्रशासन सतर्क झाले असून त्यांनी शोधमोहीम तीव्र केली आहे. या रहस्यमय घटनेमुळे नागरिकांमध्ये मात्र चिंतेचे सावट पसरले आहे.

sangharshnayak.in












Leave a Reply