लोणावळा: कौटुंबिक वादातून नैराश्य आल्याने एका उच्चशिक्षित तरुणीने आपला जीव गमावल्याची धक्कादायक घटना लोणावळ्यात उघडकीस आली आहे. मुंबईत विधी शाखेचे (LL.B) शिक्षण घेणाऱ्या २० वर्षीय विद्यार्थिनीने लोणावळ्यातील प्रसिद्ध टायगर पॉईंटवरून खोल दरीत उडी मारून आत्महत्या केली. श्रेया संजय पाटील असे या दुर्दैवी तरुणीचे नाव असून, या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, श्रेया पाटील ही तरुणी सांताक्रूझ (पूर्व), मुंबई येथील रहिवासी होती आणि ती सध्या कायद्याचे शिक्षण घेत होती. शनिवारी तिच्या राहत्या घरी काही घरगुती कारणावरून वाद झाला होता. या वादातून निर्माण झालेल्या रागाच्या भरात तिने कोणालाही काहीही न सांगता घर सोडले. त्यानंतर तिने मुंबईतून थेट लोणावळा गाठले. लोणावळ्यात आल्यानंतर तिने टायगर पॉईंट या पर्यटनस्थळी जाऊन टोकाचा निर्णय घेतला. टायगर पॉईंट परिसरात एक बेवारस बॅग आणि चप्पल आढळून आल्यानंतर या घटनेचा सुगावा लागला. तेथील सुरक्षारक्षक आणि स्थानिक लोकांनी याबाबत लोणावळा ग्रामीण पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरू केला असता, बॅगेतील कागदपत्रांच्या आधारे सदर साहित्य श्रेया पाटील हिचे असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी तात्काळ तिच्या कुटुंबियांशी संपर्क साधला, तेव्हा ती घरातून रागावून निघून गेल्याची माहिती समोर आली. श्रेयाने टायगर पॉईंटवरून शेकडो फूट खोल दरीत उडी मारल्याचे स्पष्ट झाल्यानंतर, पोलिसांनी तिच्या शोधासाठी ‘शिवदुर्ग मित्र’ या रेस्क्यू पथकाची मदत घेतली. लोणावळ्यातील दरी अत्यंत खोल आणि दुर्गम असल्याने शोधकार्यात अडथळे येत होते. मात्र, शिवदुर्गच्या पथकाने अथक प्रयत्न करून खोल दरीतून श्रेयाचा मृतदेह बाहेर काढला. या प्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलीस पुढील तपास करत आहेत. क्षुल्लक वादातून एका होतकरू विद्यार्थिनीचा असा अंत झाल्याने सर्वत्र दुःख व्यक्त केले जात आहे.












Leave a Reply