चिखली (प्रतिनिधी) – पोलीस स्टेशन चिखली येथे फिर्यादी अनिल मारोती शिंदे (वय 30, रा. उंचेगाव, ता. हदगाव, जि. नांदेड) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ते व गणेश भागवत गुड्डा हे MH-26 CY 0877 या वाहनाने हदगाव येथून छत्रपती संभाजीनगर येथे जाऊन परत चिखली तालुक्यातील केळवद येथे आले होते. दरम्यान, केळवद येथील हॉटेल गुलमोहरजवळ थांबले असता समोरून MH-01 CJ 5716 क्रमांकाची स्विफ्ट डिझायर कार येऊन रस्त्याच्या विरुद्ध दिशेला थांबली. यावेळी गणेश गुड्डा हे संबंधित गाडीतील इसमांना भेटण्यासाठी गेले असता त्यांच्यात वाद झाला. त्यानंतर आरोपींनी त्यांना चापटा, बुक्यांनी व काठीने बेदम मारहाण केली. या प्रकरणी पो. स्टे. चिखली येथे अप. क्र. 232/2026 अन्वये भा.न्या.सं. कलम 118(1), 3(5) नुसार गुन्हा दाखल करून तपास सुरू करण्यात आला. मात्र, उपचारादरम्यान गणेश गुड्डा यांचा मृत्यू झाल्याने सदर गुन्ह्यात कलम 103(1) (खून) समाविष्ट करण्यात आले. तपासादरम्यान आरोपींनी गणेश यांना ठार मारण्याच्या उद्देशाने मारहाण करून गाडीच्या डाव्या बाजूच्या दरवाजाच्या खिडकीत अडकवून सुमारे 50 मीटर अंतर फरपटत नेल्याचे निष्पन्न झाले. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या सूचनेनुसार चिखली पोलिसांनी तपासासाठी तीन पथके तयार केली. तांत्रिक व गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी शेख शाहरुख शेख प्यारु (वय 31) व सुप्रबुद्ध महादेव हिवराळे (वय 33, दोन्ही रा. बोथा काजी, ता. खामगाव, जि. बुलढाणा) यांची नावे निष्पन्न झाली. दरम्यान, पोलिस पथक बोथा काजी येथे जात असताना संशयित स्विफ्ट डिझायर वाहन दिसून आले. पोलिसांनी वाहन थांबविण्याचा प्रयत्न केला असता चालकाने गाडी वेगाने पळवली. पाठलाग करून दोन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असून त्यांना अटक करण्यात आली आहे.आरोपींना न्यायालयात हजर केले असता दि. 30 मार्च 2026 पर्यंत चार दिवसांची पोलीस कोठडी मंजूर करण्यात आली आहे.
सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड व उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक भूषण गावंडे, पोलीस उपनिरीक्षक शरव भागवतकर, पोलीस हवालदार विकास देशमुख, विजय किटे, पोलीस नाईक अमोल गवई, तसेच पोलीस अंमलदार अनिल वाघ, प्रशांत चंदर, राहुल पापचन, निलेश सावळे, अजय इटावा, पंडरी मिसाळ, सुनील राजपूत, विशाल वायाळ, महिला पोलीस अंमलदार ललिता खरात, पंचशिला ससाणे व रुपाली उगले यांनी पार पाडली.













Leave a Reply